
सावंतवाडी : स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने श्री स्वराज्य संघटना, बांदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी 19 फेब्रुवारी पर्यंत विविध स्पर्धांचे तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अर्चना घारे-परब यांनी छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजक श्री स्वराज्य संघटना यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना देखील पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बांदा सरपंच सौ. प्रियांका नाईक, बांदा पोलीस उपनिरीक्षक श्री. झांजुर्णे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, स्वराज्य संघटना अध्यक्ष निलेश मोराजकर, उद्योजक संदीप घारे, राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडीचे पदाधिकारी प्रशांत पांगम, समीर सातार्डेकर, विवेक गवस, विलास सावंत आदी उपस्थित होते.