
सावंतवाडी : सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले गाव कुणकेरी येथे प्रचारासाठी प्रवेश बंदी असा बॅनर लावण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावामधील सरुंदेवाडी रस्ता आजही पुलाच्या प्रतीक्षेत असल्यानं व वारंवार अर्ज,विनंती करून हैराण झालेल्या सरूंदेवाडी ग्रामस्थांनी सर्वपक्षीयांना थेट गावात प्रचारास प्रवेश बंदी केली आहे.
या वाडीवर जाण्यासाठीच्या मार्गात मोठा ओहोळ असल्याने या वाडीचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. मागील 20 वर्षांपासून वेळोवेळी या वाडीवरील रहिवाशांनी सर्वपक्षिय मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदने दिली, साकडे घातले. मात्र, निवडणूकीपुरती खोटी आश्वासाने देऊन तोंडाला पाने पुसण्या पलीकडे काहीही केले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे या सर्व राजकीय आश्वासाने व भूलथापान्ना कंटाळून येणाऱ्या लोकसभा व त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पुढऱ्यांना तसेंच कार्यकर्त्यांना वाडीमध्ये प्रचारासाठी येण्यास प्रवेश बंदी केली आहे. तसा फलक देखील वाडीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. जोपर्यंत कुणकेरी सरूंदेवाडीमध्ये जाण्यासाठी पुल बांधून मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षान प्रचारासाठी येऊ नये अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.