25 एकरातला बांबू आगीत खाक !

Edited by: भरत केसरकर
Published on: February 22, 2024 14:27 PM
views 171  views

कुडाळ : माणगाव खोऱ्यातील कालेली न्हयदेवी मंदिरा जवळील प्रकाश मोरये यांनी करारावर घेऊन बांबू लागवड केलेल्या सुमारे पंचवीस  एकर बागेला काल बुधवारी दुपारी साडेबारा वाजनेच्या सुमारास अचानक आग लागून सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे.       

माणगाव खोऱ्यातील कालेली कांदूळी रस्त्यावरील कालेली न्हयदेवी मंदिर येथील परब ,नाईक आणि घाडी यांची सामायिक पंचवीस एकर जमीन आहे. ही जमीन प्रकाश मोर्ये  यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी करारावर घेतली होती. या जमिनीत मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्यात आली होती. या लागवडीमध्ये  विद्युत भारित तारा असल्यामुळे खबरदारी घेऊन बांबूची लागवड करण्यात आली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास विद्युत भारित तारांमध्ये पार्किंग होऊन बागेला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली.  या  आगीत बांबू लागवड केलेली बांबूची झाडे आगीच्या भक्षस्थानी सापडल्यामुळे प्रकाश मोरये यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागली हे समजताच स्थानिक नागरिकांनी सदर आग कशामुळे लागली याची पाहणी केली असता सदर आग  विद्युत भारीत तारांच्या स्पर्किंग मुळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेचच प्रकाश मोरये यांना घटनेची माहिती दिली. मोरये यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारच्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण  केल्यामुळे पूर्ण बाग आगीच्या भक्ष्य स्थानी सापडली.

या आगीत बांबू लागवडीचे सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले असून सदर नुकसानीची माहिती तहसीलदार कुडाळ व तलाठी कार्यालय यांना कळविण्यात आली आहे. आगीने नुकसान झालेल्या बांबू लागवडीला आज पाणी घालून बांबू वाचविण्याचा प्रयत्न मोरये यांच्याकडून केला जात आहे .मात्र सध्या वातावरणातील वाढता उष्मा या नुकसान झालेल्या बांबू लागवडीला किती फायदेशीर ठरेल याबाबत मोरये यांनी चिंता व्यक्त केली आहे.