मराठी शाळा वाचविण्यासाठी बाळू निचम यांनी वेधलं राज्याच्या मुख्य सचिवांचं लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 14:50 PM
views 152  views

सावंतवाडी : मराठी शाळा वाचविण्यासाठी मराठी शाळेत प्रवेश घेतलेल्या व घेणाऱ्या पाल्यांना शासकीय नोकरीत आरक्षण मिळण्याबाबत बाळू निचम यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांच लक्ष वेधले आहे. 


सध्या शासनाच्या प्राथमिक शाळा ह्या शासकीय कर्मचाऱ्यांमुळेच ओस पडू लागलेल्या आहेत. व ओस पडण्यासाठी शासन प्रोत्साहित करीत असून मराठी शाळेतील शिक्षकांच्या बदल्या कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने करुन प्राथमिक शाळा बंद करण्याचा शासनाचाच प्रयत्न दिसून येतो. असे प्रथमदर्शनी दिसून येते. मराठी भाषा व मराठी शाळा वाचविण्यासाठी व प्राथमिक शिक्षण हक्काचे मिळण्यासाठी प्राथमिक शाळेत प्रवेश घेवून शाळेबाहेर पडणाऱ्या पाल्यांसाठी व प्राथमिक मराठी शाळेकडे कल वाढण्यासाठी शासकीय भरती किंवा अन्य भरती प्रक्रियेत किमान ७० टक्के राखीव जागा ठेवून भरती प्रक्रिया यापुढे कार्यान्वित करुन मराठी शाळा वाचविण्यासाठी सहकार्य करावे. सध्या भरती प्रक्रिया शासनाने सुरु केलेली असून या प्रक्रियेत सुद्धा शासनाने मराठी शाळेत प्रवेश घेवून बाहेर पडलेल्या पाल्यांना / उमेदवारांना ७० टक्के आरक्षण द्यावे तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना आपले पाल्य प्राथमिक शाळेत सक्तीने पाठविणेबाबत भरती प्रक्रियेत तशी अट ठेवूनच प्रक्रिया पूर्ण करावी व मराठी भाषा व मराठी शाळा वाचवाव्यात अशी विनंती मुख्य सचिवांकडे बाळू निचम यांनी केली आहे.