
मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील औदुंबर ते श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग हॉटेल पर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम होत नसल्याने श्रीकृष्ण सेवा मंडळ धुरीवाडा नागरिकांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न झाल्यास आम्ही उपोषणास बसू, असा इशारा यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी श्रीकृष्ण सेवा मंडळ धुरीवाडा ग्रामस्थ यांच्यावतीने नगरपालिकेचे अधिकारी श्री. सुधाकर पाटकर यांना निवेदन सादर करून धुरीवाडा येथील औदुंबर ते श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग हॉटेल पर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत लक्ष वेधण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत गांवकर, बाबी जोगी, शिवाजी केळूसकर, संदेश कोयंडे, लक्ष्मण शिर्सेकर, नामदेव सारंग, आनंद जामसंडेकर, विनायक सारंग, तुळशीदास गोवेकर, जगन्नाथ खडपकर, शंकर शिर्सेकर, दीपक गोवेकर, विजय खडपकर, नारायण तारी, शशिकांत आडकर, हेमंत जोशी, पांडुरंग माणगावकर, वैभव वेंगुर्लेकर, संतोष शिर्सेकर, राजेश मणचेकर, विष्णू सारंग, किरण जोगी, देवेंद्र धुरी, पांडुरंग देऊलकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
धुरीवाडा येथील सदर रस्ता खराब झाला असून वाहनचालकांना कसरत करून ये - जा करावी लागत आहे. या रस्त्याचे काम मंजूर असून देखील अद्यापपर्यंत नगरपालिकेकडून या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. एप्रिल महिन्यात धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा वार्षिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे या कार्यक्रमापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता सुस्थितीत असणे आवश्यक आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धुरीवाडा गावाचीही बदनामी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी धुरीवाडा ग्रामस्थांनी केली. यावेळी अधिकारी सुधाकर पाटकर यांनी सदर रस्त्याचे काम मंजूर असून निविदा प्रक्रिया झाली आहे, मात्र अद्याप ठेकेदाराशी करारनामा तसेच वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्याने हे काम सुरु करण्यात आलेले नाही असे सांगत करारनामा व वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन नागरिकांना दिले.