
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सुपारी गळती, भातपिकाची हानी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत. मात्र शासन आणि प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, केवळ सवंग प्रसिद्धीसाठी "ठाकरे" कुटुंबावर टीका करू नये, असा टोला शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी लगावला आहे. ते दोडामार्ग भेटीत पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बोलत होते.
धुरी म्हणाले की, “सुपारी गळतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातपिकाचीही प्रचंड हानी झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पण शासन व प्रशासन या प्रश्नांकडे कानाडोळा करत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ओला दुष्काळ जाहीर होणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी पुढे पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधत म्हटले की, “फक्त ठाकरे कुटुंबावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम झाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी वा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोलण्यास ते तयार नाहीत. अशा राजकारणाचा काहीही उपयोग नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना विकासाच्या गप्पा आणि ठोस निर्णय हवे आहेत. शेतकरी संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या ठोस धोरणाची गरज आहे. पालकमंत्री यांनी हा उवदव्याप बंद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे. असा टोलाही त्यांनी लगावला.