जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल : SP सौरभ अग्रवाल

Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 26, 2023 15:38 PM
views 140  views

सिंधुदुर्गनगरी : अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्या विळख्यातून बाहेर यावी, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल. असा विश्वास पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी व्यक्त केला.

     येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, प्रशिक्षणार्थी आयएएस करिष्मा नायर, विशाल खत्री, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, किशोर सावंत, पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

     श्री. अग्रवाल म्हणाले, अंमली पदार्थ्याच्या विळख्यात अडकल्याने शारिरीक मानसिक सामाजिक नुकसान होण्याबरोबरच युवापिढीवरही त्यांचे गंभीर परिणाम होत आहे. अंमली पदार्थ्यांच्या सेवन, विक्री, वाहतूक यावर निर्बंध यावेत, त्याबाबतची जनजागृती व्हावी, यासाठी पोलीस विभागाच्या वतीने 19 ते 26 जून या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत व्याख्यान, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा याव्दारे जनजागृती करण्यात आली. 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांनीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेस सहभाग नोंदवून नशामुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले.

       मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी, यांनी व्यसनामुळे होणारे दुष्पपरिणाम, मानसिकता व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. गजानन तोडकरी यांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांबाबत सखोल माहिती दिली. महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी नशामुक्तीमध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व प्रशासकीय बाबींच्या समावेशाबाबत मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केले. सुत्रसंचालन पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांनी केले. तर आभार देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मानले.