ज्ञानदीपचे पुरस्कार प्रदान !

संस्कारक्षम कार्य करणाऱ्यांचा ज्ञानदीपकडून सन्मान : मंत्री श्रीपाद नाईक
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 12:09 PM
views 198  views

सावंतवाडी : परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला आहे. या जीवनाचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याच काम ज्ञानदीपनं केल. संस्था १८ वर्ष करत असलेलं कार्य कौतुकास्पद आहे‌. जीवनात समाजसेवा अन् देशसेवा करण अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंत्री नाईक यांच्या हस्ते मान्यवरांना ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सामाजिक कार्यकर्ते राजन मडवळ, प्राध्यापक राजाराम परब, प्राचार्य सलिम तकिलदार, प्राध्यापिका सुमेधा सावळ, प्राथमिक शिक्षक संजय बांबुळकर, प्राथमिक शिक्षिका मृगाली पालव, शिक्षकेतर संघटना विभागीय कार्यवाह गजानन नानचे यांचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व‌ मानाचा फेटा बांधून पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामाजिक भान ठेवून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या हेतूने हा उपक्रम मंडळातर्फे सलगपणे अठरा वर्षे राबविण्यात येतो. यंदाचा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सोहळ्यातील भगवे फेटे हे खास आकर्षण ठरले. सुरूवातीला दाणोली येथील विद्यार्थ्यांनी सुश्राव्य असं स्वागत गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. पुरस्कार प्राप्त प्रा. सुमेधा सावळ, सलिम तकिलदार, राजाराम परब, अभिमन्यू लोंढे यांनी मनोगत व्यक्त करत आभार मानले. 

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील मनोगतात म्हणाले, कार्याचा सन्मान करण्याच काम ज्ञानदीपन केलं आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तीमत्वांचा सत्कार करताना अत्यानंद झाला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच गोवा व बेळगाव यांना लगत आणणाऱ्या प्रस्तावित रस्त्यासह ऐतिहासिक पारगड किल्ल्याच्या विकासासाठीची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद श्री. नाईक यांनी दिला. 

अध्यक्षीय भाषणा दरम्यान मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले, संस्कृती, संस्कार यांचा विचार आज होत नाही आहे. अशावेळी समाज जागृत रहावा यासाठी काम करणाऱ्या मंडळींची गरज असते. अशाच व्यक्तीमत्वांचा सन्मान याठिकाणी झाला. ज्ञानदीप सारख्या संस्थेन समाजासाठी संस्कारक्षम कार्य केलं असून समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याच काम करत आहेत. गेली १८ वर्ष करत असलेलं कार्य हे कौतुकास्पद आहे‌ असं मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लजचे माजी चेअरमन उदयकुमार देशपांडे, ज्ञानदीपचे संस्थापक वाय पी नाईक, अध्यक्ष जावेद शेख, सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे, तुकाराम बेगणे, सचिन बल्लाळ, म.ल.देसाई, कुणकेरी सरपंच सोनाली सावंत, शशिकांत साळगावकर, दत्तप्रसाद गोठसकर, राजू तावडे, हरिश्चंद्र पवार, अनंत जाधव, दीपक गांवकर, शामराव मांगले, एस.जी.साळगावकर, निलेश पारकर, विनायक गांवस, वैभव केंकरे, आर.व्ही.नारकर, प्रदीप सावंत, प्रतिभा चव्हाण, श्रद्धा सावंत, एस. व्ही. भुरे, संजय लाड, वैभव केंकरे, काका मांजरेकर, ललित हरमलकर, मनोहर परब, पोपटराव बागुल, महादेव गावडे, आत्माराम राऊळ, अनिल राऊळ, प्रमोद पावसकर, कृष्णा मेस्त्री, भरत बाळेकुंद्री, महेश पालव, पांडुरंग काकतकर, पुर्वा जाधव, समीर शिंदे, एकनाथ धोंगडे, अनिल ठाकुर, सतीश राऊळ, अरूण चिंचगणी, तुकाराम बेनके आदींसह ज्ञानदीपचे सदस्य, पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे हितचिंतक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय.पी.नाईक यांनी केले. यात अठरा वर्षे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेत संस्थेतील सर्व पदाधिकारी वेळ देतात, सामाजिक भान ठेवून कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन विठ्ठल कदम, भरत गावडे, महेश पालव यांनी तर आभार विनायक गांवस यांनी मानले.