
दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यात लक्ष लागून राहिलेल्या साटेली-भेडशी व बोडण या दोन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीसाठी एकूण ६२.८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही ग्रामपंचायतच्या एकूण ३ हजार ४१८ मतदारांपैकी २ हजार १४९ मतदारांनी मतदान केले.
यात साटेली-भेडशी साठी ६२.९५ टक्के तर बोडण साठी ६२.४८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तहसिलदार संकेत यमगर व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या टीमने अतिशय चोख कामगिरी बजावली.
साटेली-भेडशी व बोडण या दोन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानात १ हजार ७१५ पुरुष व १ हजार ७०३ महिलांपैकी अनुक्रमे १ हजार ०८७ पुरूष व १ हजार ०६२ महिलांनी मतदान केले.
दोडामार्ग तालुक्यातील निवडणुक लागलेल्या साटेली-भेडशी, कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) व बोडण (शिरंगे पुनर्वसन) या तीन ग्रामपंचायतींपैकी कुडासे खुर्द ही एक ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाल्याने उर्वरीत दोन ग्रामपंचायतसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. हि मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत झाली. सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का अतिशय संथ असल्याचे दिसून आले. मात्र ज्येष्ठांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. त्यामुळे दुपारी रणरणत्या उन्हातही मतदान केंद्रावर येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. काही वयोवृद्धांनी कुटुंबातील व्यक्तींची मदत शिवाय शेजारील व्यक्तींची मदत घेत मतदान केंद्र गाठले व मतदान केले. मतदान प्रक्रियेवेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साटेली-भेडशी येथे ६२.९५ टक्के व बोडण येथे ६२.४८ टक्के मतदान झाले. सरपंच पदासाठीच्या ६ व सदस्य पदासाठीच्या १८ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.
दरम्यान रविवारी झालेल्या मतदानाची दुसऱ्या दिवशीच सोमवारी निकाल जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे. या निकालाने मतदारांनी कोणत्या उमेदवाराला एन दिवाळी सणात दिवाळी साजरी करायला दिली. आणि कुणाचं मतदानाने दिवाळं काढल हे पाहणे सुद्धा गमतीशीर ठरणार आहे.