
सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्यासाठी एकूण 19,557 मे. टन खताच्या मागणीच्या प्रमाणात राज्य शासनाकडून 12,259 मे.टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. या मंजूर आवंटनानुसार माहे एप्रिल 916 मे.टन, माहे मे 1,422 मे.टन, माहे जून 2,887 मे.टन, माहे जुलै 2,765 मे.टन, माहे ऑगस्ट 2,337 मे.टन आणि माहे सप्टेंबर 1,932 मे.टन याप्रमाणे खताचा पुरवठा करण्याबाबत सर्व खत पुरवठादार कंपनींना आराखडा ठरवून दिला आहे.
सद्यस्थितीत माहे 07 जुलै2025 अखेर एकुण 10,095 मे.टन खताचा पुरवठा झालेला आहे. हे प्रमाण एकूण मंजूर आवंटनाच्या 82 टक्के इतके आहे. आजअखेर जिल्ह्यात युरिया 2058 MT,एमओपी 117MT,संयुक्त खते 1233MT,सिंगल सुपर फॉस्फेट 635 MT आणि सेंद्रिय खत FOM153 MT असा एकूण 4,197 MTखतांचा साठा उपलब्ध आहे.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. (RCF) आणि पॅरादीप फॉस्फेटस लिमिटेड (PPL) या प्रमुख खत पुरवठादार कंपनीमार्फत मागणीनुसार खत पुरवठा करण्याचे काम सुरु असून RCF कंपनीची 7वी रेक रत्नागिरी येथे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नियोजित असून खत विक्रेते यांनी त्यांचेकडील वाढीव खत मागणीसाठी संबंधित कंपनी यांना संपर्क करण्याबाबत कळविलेले आहे.
केंद्र शासनच्या अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत खत या निविष्ठाचा अंतर्भाव असून सर्व अनुदानित खते पॉस मशीनद्वारे विक्री करावयाचे बंधनकारक आहे. यावर्षीपासून L-1 बायोमेट्रिक पॉस मशीनचा वापर सुरु झालेला आहे. सर्व खत विक्री केंद्रांनी त्यांच्या पॉस मशीनवरील खतसाठा आणि प्रत्यक्ष गोडावून मधील शिल्लक साठा यांचा ताळमेळ वेळच्यावेळी अद्यावत करावयाचा आहे. जर विक्रेत्यांच्या पॉस मशीनवरील खतसाठा प्रत्यक्ष शिल्लक असलेल्या खतसाठ्याशी जुळत नसेल तर अशा विकेत्यांविरुध्द खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.