आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या : दीपक केसरकर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 20, 2024 14:47 PM
views 30  views

सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या  नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यात सिंधुदुर्ग जिल्यातल्या ०६ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या तरुणांनी या केंद्राचा लाभ घेण्याचे  आवाहन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन आज कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले  राज्य शासनाने जर्मनीशी केलेल्या कराराप्रमाणे राज्यभरातून एक लाख कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यंना जर्मनीमध्ये रोजगार मिळणार आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातून २०० विद्यार्थी तर राज्यातून पहिल्या टप्प्यात दहा हजार तरुण जर्मनीत रोजगारासाठी जाणार आहेत.  केंद्राच्या विविध योजनेतून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन निवासी शाळा आणि एक हुशार विद्यार्थ्यांसाठी शाळा लवकरच  उभारली जाणार असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, , प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे,कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त श्री. चिमणकर, कामशिप्र मंडळाचे सहसचिव महेंद्र गवस, महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उप कार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनंत लोखंडे, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 

 जिल्हयातील सहा  महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राचा आज शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाला.  यामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळसह  श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर सांगुळवाडी, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सांगुळवाडी, मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी अँड मेनेजमेंट, मालवण, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली या  महाविद्यालयाचा समावेश आहे. आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत दरवर्षी  १५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.