
वैभववाडी : ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे अद्यापही महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारात दिसत नाही. त्यांची नाराजी दुर झाली नाही. रावराणे हे उद्या वैभववाडीत येणार असून त्यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. श्री.रावराणे हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संदेश पारकर यांना ठाकरे शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, या जागेसाठी इच्छुक असलेले अतुल रावराणे हे नाराज झाले आहेत. गेले पंधरा दिवस ते पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त राहीले आहेत. पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्या आजारपणाच कारण सांगण्यात येत आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समजते. श्री.रावराणे उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत.त्यामुळे त्यांनी पक्ष कार्यक्रमाला येण्याचं टाळले आहे. मागील पंधरा दिवस मुंबईत असलेलं श्री रावराणे हे रविवारी वैभववाडीत येणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर ते आपली भूमिका मांडणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. या दौऱ्यापुर्वी रावराणे काय निर्णय घेणार? पक्षासोबत राहणार की बंड करणार ? नेमकी कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता सा-यांनाच लागली आहे.