हायवे अधिकाऱ्यांमुळे स्थानिक जमीनमालक रोजगार हीन : अतुल रावराणे

पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांची भूमिका काय..? | रावराणे यांचा सवाल
Edited by: साहिल बागवे
Published on: May 26, 2025 14:04 PM
views 284  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोर लाईन नॅशनल हायवेच्या संपादित जागेत अवैध टपरी हॉटेल व्यावसायिक व्यवसाय करत असून, हायवेसाठी जागा देणाऱ्या स्थानिक भूमीपुत्रांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे. नॅशनल हायवेचे अभियंता अधिकारी या अनधिकृत टपरी हॉटेल व्यवसायिकांकडून भाडे उकळत आहेत. ज्या स्थानिक जमीन मालकांनी आपल्या जमिनी हायवेला दिल्या त्याना हायलेलगतच्या जमिनीत व्यवसाय करून रोजगार मिळेल ही अपेक्षा होती. मात्र, हायवे अधिकाऱ्यांमुळे स्थानिक जमीनमालक रोजगार हीन झाले आहेत. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांची याबद्दल भूमिका काय ? असा सवाल शिवसेनेचे नेते तथा भैरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेना उबाठाचे कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, सिद्धेश राणे उपस्थित होते. 

पुढे बोलताना रावराणे म्हणाले की, अवकाळी पावसाने प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सिंधुदुर्गात रस्ते आहेत की नाहीत तेच कळत नाही. सिंधुदुर्गातील चौपदरी नॅशनल हायवे पूर्ण झाला. हायवेसाठी जमीनमालक शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जमिनी दिल्या. ज्या जमिनी शेतकरी बांधवांनी दिल्या त्याचा मोबदला केंद्र सरकारने दिला. मात्र हायवेचे कार्यकारी अभियंता उपअभियंता, शाखा अभियंता हायवेलगत च्या उर्वरित जमिनी भाडेतत्वावर लीज ने परप्रांतीयांना देत आहेत. स्थानिक जमिनमालक भूमीपुत्रांच्या तोंडच्या घास हायवेचे अधिकारी हिरावून घेत आहेत. हायवे लगतच्या संपादित जमिनीतील अनधिकृत टपऱ्या ह्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत ? असा सवालही अतुल रावराणे यांनी केला. 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातून हा हायवे जातो. विद्यमान खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही याकडे लक्ष द्यावे. खारेपाटण ते बांदा पर्यंत सुमारे शेकडो अनधिकृत टपऱ्या आणि हॉटेल्स हायवे संपादित जागेत सुरू असल्याचा आरोप अतुल रावराणे यांनी केला. हायवे संपादित झालेल्या ह्या जागेत अनधिकृत बांधकाम मधील व्यवसायिकांशी हायवे च्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोपही रावराणे यांनी केला. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे हे स्थानिक भूमीपुत्राला न्याय देणार की अनधिकृत टपरीधारक परप्रांतीयांच्या बाजूने राहणार ? पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांची या संदर्भात भूमिका काय ? हे जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचेही रावराणे म्हणाले. यावेळी प्रथमेश सावंत, सिद्धेश रावराणे उपस्थित होते.