सिंधुदुर्गनगरी न.पं.साठी मुख्यालय पत्रकार संघाचे उद्या लक्षवेधी धरणे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 26, 2023 10:23 AM
views 101  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय होऊन तब्बल २५ ते ३० वर्षे लोटली तरी जिल्हा जिल्हा मुख्यालयाचा दर्जा असलेल्या शहराला अजुनही शासन नगरपंचायत करण्यात राजकीय सारीपाटावर दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालय परिसरातील सिंधुदुर्गनगरीसह रानबांबुळी, ओरोस, आणाव गावातील जनतेने उपस्थित राहून आपला पाठिंबा द्यावा असे आवाहन जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे व सचिव लवू महाडेश्वर यांनी केले आहे.


सिंधुदुर्गनगरी रानबांबुळी, ओरोस आणि अणाव या तीन गावांमध्ये वसली आहे. केली २५ -३० वर्षे नवनगर विकास प्राधिकरणच्या अखत्यारीत असलेल्या या शहराचा विकास खुंटला आहे. रस्ते,पाणी, वीज, नागरी सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन तसेच इमारतींची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक अनेक गैरसोयीना सहन करावे लागत आहे. जिल्हा मुख्यालय दर्जा असलेली सिंधुदुर्गनगरी ही एकमेव राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेली नगरपंचायत पासून वंचित आहे. राजकीय सारीपाटात अडकलेल्या या नगरपंचायतीच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे राजकीय नेते आणि मंत्री दुर्लक्ष करत आहे. नागरी विकासासाठी येणारा कोट्यावधी निधी पासून ही वंचित ठेवली आहे.
       
तत्कालीन वित राज्य मंत्री आणि सध्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गनगरीच्या विकासासाठी रौप्य महोसवी वर्षी पंचवीस कोटीची घोषणा केली. त्यापैकी फक्त ८ कोटीच निधी प्राप्त झाला. उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर नगरपंचायतीची घोषणा करू असे गोंडस गाजर तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी सिधुदुर्गनगरीवासियांना दिले होते. परंतु अजूनही उर्वरित निधीही प्राप्त नाही आणि नगरपंचायतही घोषित नाही.  मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने मान्यतेपर्यंत आलेल्या या प्रस्तावाच्या फाईलला धूळ चढली आहे. सर्वच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी गेले अनेक वर्षात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. परंतु  नगरपंचायतीची घोषणा हवेतच विरली आहे. या प्रश्नाकडे सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या पत्रकारांनी वेळोवेळी राज्यस्तरीय नेत्यांकडे मंत्र्यांकडे लक्ष वेधले, परंतु दुर्लक्ष झाले. मात्र राजकीय सारीपाटात सिधुदुर्ग नगरपंचायत अजूनही विकासासाठी खुंटली आहे.
      
सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण म्हणून कार्यरत असलेल्या या प्राधिकरणाच्या कार्य कक्षेत कोट्यावधी रुपये निधी पडून आहे. याबाबत स्वतंत्र इमारत व्हावी तसेच रस्ते व अन्य विकास कामांसाठी सदरचा निधी खर्च करावा, सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारावर अश्वारूढ पुतळा उभारावा याबाबत बैठकांमध्ये घोषणा झाल्या परंतु, अजूनही याबाबत कोणती ही कार्यवाही होत नाही. अनेक अधिकारी बदलले, मंत्री बदलले परंतु सिंधुदुर्गनगरीच्या विकासामध्ये बदल होताना दिसत नाही. याला कोण जबाबदार सर्वच राजकीय पक्षांची नगरपंचायत व्हावी अशी मागणी असताना दुर्लक्ष होतो. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने बाहेर पडणारी फाईल अजून धुळकात पडून राहते याला जबाबदार कोण ? सिंधुदुर्ग नगरीचा विकास कधी होणार ? जिल्हा मुख्यालय असूनही सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत का होत नाही हाच संशोधनाचा विषय बनला आहे. यावर लक्ष वेधण्यासाठी बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रश्नावर शासनाला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. तरी सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांनी तसेच ओरोस, रानबांबुळी,आणाव गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.