
सिंधुदुर्गनगरी : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा विवेक विचार मंच – महाराष्ट्र तर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने केलेला हा हल्ला “दुर्दैवी, असंविधानिक आणि निंदनीय” असल्याचे मंचाचे समन्वयक डॉ. मिलिंद कुलकर्णी (सिंधुदुर्ग) यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. या प्रकाराने देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात झाल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांना विवेक विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत या संदर्भातील निवेदन सादर केले आहे. यावेळी विवेक मंचाचे संयोजक डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ प्रशांत मोघे,डॉ सुहास पावसकर,डॉ गुरु सवादत्ति, किरण जाधव, सुशील कदम,विनोद कदम,मारुति वळंजू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या मंचाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “देशातील मतभेद मांडण्यासाठी संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत. हिंसेचा अवलंब करणे हे असभ्य आणि अमर्याद वर्तन आहे.”तसेच काही समाजद्रोही व फुटीरतावादी शक्ती या घटनेचा राजकीय हेतूंसाठी वापर करून समाजात जातीय वा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही मंचाने निषेध नोंदवला आहे.
विवेक विचार मंचाने सरकारला मागणी केली आहे की, या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.“न्यायव्यवस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे,” असेही या निवेदनात म्हटले आहे.










