
शशिकांत मोरे
रोहा : रोहा तालुक्यातील किल्ला येथे वन जमिनीचा जागेतून बेकायदेशीर उत्खनन करत असलेल्या माती चोरांवर वन खात्याने धडक कारवाई करत वाहने ताब्यात घेतली आहेत. या कारवाईने किल्ला धाटाव परिसरातील माती चोरांची धाबे दणाणली आहेत.
वन खात्याकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, मौजे किल्ला येथे गट नंबर १११ मध्ये केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय वनेत्तर कामास बंदीमध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू होते. विशेष म्हणजे हे मातीचोर भलतेच हुशार. शासकीय खात्यातील शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी माती उत्खनन करतात. त्यामुळे कुणाला थांग पत्ता लागत नाही. रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी वन खात्याने किल्ला येथील माती चोरांवर धडक कारवाई करीत जेसीबी क्रमांक एमएच ०६/एएल ७१६५, डंपर क्रमांक एमएच ०५ एएम ०७४९, एमएच ०६ एसी ६६०६, एमएच ०६ एजी ६६०८ ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच जागा मालक सुनील महादेव बामूगडे व ट्रक चालक महेश कवर खांब, राजेंद्र तुकाराम भालेकर, संजय मारुती सानप, जेसीबी चालक संकेत शांताराम बाईत यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरण भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३५ (१) (७)चे उल्लंघन केल्या ने परिमंडळ कलम रोहा, रा गु न ई १/ २०२२-२३ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकम व सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज वाघमारे (वनपरिक्षेत्र अधिकारी) करीत आहेत. मागील काही वर्षांपासून असंख्य बेकायदेशीर भरावे वन खात्याच्या अथवा शेतकरी वर्गाचा जमिनीमधून उत्खनन करण्यात आले असून नाममात्र रॉयल्टी भरून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. याची तहसील खात्याने चौकशी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे.