
दोडामार्ग : दोडामार्ग विजघर राज्यमार्गावरील भेडशी येथील नवीन पुला नजीकच्या रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यातुन गाडीसह वाहत जाणाऱ्या कणकवली- वेंगुर्लेतील तीन प्रवाशांना भेडशीतील युवकांनी प्रसंगावधान राखल्याने जीवदान मिळाले आहे. बिट्टू मणेरकर, सौरभ देऊलकर, शुभम मणेरकर, महेश स्वार, मयुर कुबडे आदींनी मोठा धीर केल्याने त्या कारसह वाहून जाणाऱ्या युवकांचा जीव वाचल्याने युवकांच्या धाडसी मदतीबद्दल कौतुक होत आहे. मात्र संभाव्य धोका ओळखून जीवाची पर्वा न करता कार पाण्यात घालणाऱ्या त्या युवकांवर पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून त्याला दोडामार्ग चे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दुजोरा दिला आहे.
दोडामार्ग विजघर राज्यमार्गावरील भेडशी खालचा बाजार येथे यावर्षी नवीन पुल बांधण्यात आले आहे. याच पुलाच्या ठिकाणी दोडामार्गच्या दिशेने सुमारे १०० ते १५० मीटर रस्त्यावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आलेने तो रस्ता वाहतुकीस पूर्णपणे हा रस्ता बंद होता. याच दरम्यान सायं सात वाजण्याच्या सुमारास भेडशी खालचा बाजार हुन दोडामार्गच्या दिशेने जाणाऱ्या बोलेनो कारला तेथील जागरूक नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. खालचा बाजार येथे काही नागरिकांनी रस्त्यावर उभे केलेले बॅरल कडे दुर्लक्ष करत ती कार वेगाने नवीन पुलावर पोहचली. तेथेही असलेल्या युवकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे लक्ष न देता नवीन पुलावर पाणी नसल्याने ते युवक कार पुढे घेऊन गेले. रस्त्यावर पाण्याचा मोठा प्रवाह दिसत असतानाही त्यातून कार घालण्याच जीवघेणं धाडस त्यांनी केलं. आणि हेच जीवघेणं धाडस त्यांचे अंगलट आलं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने काही मीटर पुढे जाताच. त्या युवकांनी नंतर कार मागे घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र कार उलटून वाहू लागली. कारच्या काचा उघड्या असल्याने दोन युवक पहिल्यांदा बाहेर पडले कार मोठ्या झाडांना अडकल्याने त्यांनीही बाहेर पडून झाडांचा आधार घेतला. तर ही घटना पुलावरील आणि दामोदर मैदानालगत रस्त्यावर असलेल्या युवकांनी लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधन राखून तात्काळ मोठ्या धाडसाने मदतीसाठी धाव घेत कारमधील प्रथम त्या दोघाना बाहेर काढले व त्यानंतर कारमध्ये अडकलेल्या तिसऱ्या प्रवाशालाही बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे जीव वाचले. इतकेच नव्हे तर त्यानंतर पाण्यातून वाहत जाणारी कारही त्या युवकांनी दोरखंडाने झाडाला बांधून ठेवली. तोवर घटनास्थळी दोडामार्ग पोलीसही दाखल झाले. त्या युवकांना ताब्यात घेऊन त्यांनी पुढील कार्यवाही हाती घेतली आहे.
कारसह वाहत जाणाऱ्या तीन युवकांचा जीव वाचवण्यासाठी भेडशीतील बिट्टू मणेरकर, सौरभ देऊलकर, शुभम मणेरकर, महेश स्वार, मयुर कुबडे यांसह ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
धोका सांगणारे बॅरिकेट्स लावणे आवश्यक..
विशेष म्हणजे हा रस्ता पाण्याखाली गेल्याने पर्यायी रस्त्यावरील पुलावर सुद्धा पोलीस व महसूल प्रशासनाची टीम व स्थानिक ग्रामस्थ अनेकांना पर्यायी रस्त्यावरील पुलावरील थोडे पाणी आलेले असल्याने तेथे रहदारी साठी मदत करत होते. मात्र मुख्य रस्त्यावर आवश्यक दोन्ही बाजूंनी पुरेशा प्रमाणात ब्रॅरिकेटस् लावणे आवश्यक आहे. हा राज्यमार्ग असल्याने व गोवा, बेळगाव, कर्नाटक येथील अनेक जण तिलारी घाटातून पुढे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात. मात्र त्यांना हा अनोळखी मार्ग असल्याने संभाव्य धोका रात्रीच्या वेळी प्रकर्षाने निदर्शनास येण्यासाठी आवश्यक बरिकेट्स लावणे गरजेचे आहेत.