
वैभववाडी : गडमठ येथील चित्रकार व दशावतारी नाट्यकलावंत श्रुती संतोष सुतार यांनी आपल्या कलेतून भारतातील सुप्रसिद्ध अष्टपैलू गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अवघ्या १ सेमी रुंदी व १ सेमी उंचीच्या ‘लाल टिकली’वर त्यांनी आशा ताईंची प्रतिमा साकारून कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्राच्या गायिका आशा भोसले यांच शनिवारी निधन झाले. या निधनानंतर तालुक्यातील श्रुती सुतार यांनी आशा भोसले यांची टिकलीवर प्रतिमा साकारली आहे.या अनोख्या कलाकृतीमागील संकल्पना स्पष्ट करताना श्रृती यांनी सांगितले की, आशा भोसले यांचा गोड आवाज, त्यांच्या चेहऱ्यावरील मोहक स्मितहास्य आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानली जाणारी त्यांच्या कपाळावरील लाल टिकली ही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्या आठवणी जपण्यासाठी लाल टिकलीचाच कॅनव्हास म्हणून निवड करण्यात आली.
अत्यंत सूक्ष्म अशा या टिकलीवर प्रतिमा साकारण्यासाठी मोठ्या संयम, बारकाई आणि कौशल्याची आवश्यकता असते. श्रुती यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलत आपल्या कलेतून आशा ताईंच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे.










