पेट्रोल उपलब्ध होताच पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 27, 2026 18:38 PM
views 126  views

कणकवली : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक पेट्रोल पंपांवर सातत्याने ‘पेट्रोल,डिझेल उपलब्ध नाही’ असे फलक झळकत होते. कणकवली शहर व परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी सकाळी कणकवलीतील चारही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध झाल्याने वाहनचालकांनी मोठी गर्दी केली आणि पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

कणकवली शहर व परिसरात बसस्थानकानजीक, पोलीस स्थानकाजवळ, वागदे आणि जानवली येथे असे एकूण चार पेट्रोल पंप आहेत. गुरुवारी दिवसभर किरकोळ अपवाद वगळता या पंपांवर पेट्रोल उपलब्ध नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या सुमारास चारही पंपांवर पेट्रोल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच वाहनचालकांनी पंपांकडे धाव घेतली. विशेषतः आचरा रोडवरील पोलीस स्टेशनच्या पेट्रोल पंपावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा अगदी आचऱ्याला जाणाऱ्या रोडपर्यंत लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बस स्थानक शेजारी पेट्रोल पंपावर देखील गर्दी होती.शिवाय वागदे येथील नाईक पेट्रोल पंपावर देखील गर्दी वाहनांच्या रांगा दिसून आल्या. एकंदरीतच इंधनटंचाईमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पेट्रोलचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.