आरोग्य अधिकारी कार्यालयात तब्बल चाळीस पदे रिक्त

Edited by:
Published on: April 27, 2025 14:34 PM
views 109  views

मंडणगड : अपुरे कर्मचारी, साधनाचा अभाव या दोन कारणांमुळे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास विविध शासकीय योजनाची अंमलबजावणी व संदर्भीत आरोग्य सेवा पुरवण्याकरिता अडचणी येत आहेत, त्यामुळे तालुकावासीयांची मोठी अडचण होत आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून प्राप्त माहीतीनुसार तालुक्यातील तीन प्राथमीक आरोग्य केंद्रे व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात एकूण चाळीस विविध प्रकारची पदे रिक्त आहेत. गेल्या तीन दशकात या कार्यालयाचा कारभार येनेकेने प्रकारे चालवा असेच वरिष्ठांचे धोरण दिसून येत आहे या संदर्भात तालुकावासीयांकडुन वेळोवेळी झालेल्या मागण्या व तक्रारीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. प्राथमीक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची एकूण पाच पदे रिक्त आहेत. यात देव्हारे प्राथमीक आरोग्य केद्रांतील दोन्ही पदे रिक्त आहेत.

आरोग्य सहाय्यक महिला पंदेरी व कुंबळे येथील प्रत्येक एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत. मिश्रीक कुंबळे येथील एक पद रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पंदेरी व कुंबळे येथील प्रत्येक एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत. कुष्ठ रोग तंत्रज्ञ पंदेरी येथील एक मंजुर पद रिक्त आहे. आरोग्य सेवक पुरुष कुंबळे येथे एक तर देव्हारे येथे दोन अशी तीन पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवक महिला यांची पंदेरी येथे तीन, कुंबळे येथे तीन व देव्हारे येथे एक अशी सात पदे रिक्त आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी यांची पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक पद अशी दोन पदे रिक्त आहेत.

परिचर पुरुष यांची कुंबळे पंदेरी व देव्हारे येथे प्रत्येकी दोन अशी सहा पदे रिक्त आहेत. परिचर महिलांची पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक अशी दोन पदे रिक्त आहेत. सफाई कामगार कुंबळे देव्हारे व पंदेरी येथे प्रत्येकी एक अशी तीन पदे रिक्त आहेत. अंशकालीन स्त्री परिचर पंदेरी व कुंबळे येथे प्रत्येकी एक अशी दोन पदे रिक्त आहेत. आशा स्वयंसेविकांची कुंबळे व पंदेरी येथे प्रत्येक एक अशी दोन पदे रिक्त आहेत. बदलत्या काळातील आजारांचा विचार करता सोनाग्राफी, एक्स.रे. सिटीस्कँन व डायलेसीस यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांना या संदर्भातील उपचार व वैद्यकीय सेवांच्या उपचारासाठी तालुक्याचे बाहेर जावे लागत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून ग्रामिण भागातील जनतेसाठी केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून साधीचे आजारांसह विविध आरोग्य सेवा पुरविल्या जातात सद्यस्थितीत अपुरे कर्मचारी व तांत्रीक साधनांचा अभावामुळे अडचणी येत असल्याने कर्मचारी व साधने उपलब्ध करुन देण्याची मागणी तालुक्यातुन कऱण्यात येत आहे.