
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून लहान-थोर नागरिक गौरी-गणपती सणाच्या तयारीमध्ये पूर्णपणे मग्न आहेत. यावर्षी तालुक्यात तब्बल १८, १४२ घरगुती आणि १० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत.
आज २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्याने मूर्तीशाळा, बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची लगबग वाढली आहे. सावंतवाडी शहरात सार्वजनिक ७ आणि तालुक्यात घरगुती १०,५०० गणपतींची स्थापना होणार आहे. तर बांदा येथे ७,६४२ घरगुती आणि ३ सार्वजनिक गणपती विराजमान होतील. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरांची रंगरंगोटी केली असून विद्युत रोषणाईने घरे उजळून निघालीत. गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झालेत. घरगुती गणपती दीड, पाच, सात, नऊ, किंवा अकरा दिवसांसाठी विराजमान होणार असून सार्वजनिक गणपती अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस दिवसांसाठी विराजमान होणार आहेत. गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने श्रींची पूजा करणार असून ''गणेशोत्सव सण मोठा, महागाईचा नाही तोटा'' अशीच परिस्थिती आहे. राज्य महोत्सव म्हणून यावर्षी पासून गणेशोत्सव साजरा होत असताना प्रत्येक घरात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.