सोनुर्ली गावासाठीचा 'तो' टॉवर असून नसल्यासारखा..?

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 14:02 PM
views 92  views

सावंतवाडी : सोनुर्ली गावासाठी उभारण्यात आलेला बीएसएनएलचा टॉवर असून नसल्यासारखा आहे. या ठिकाणी बॅटरी बॅकअप नसल्याने हा टॉवर जास्त करून बंदच असतो. टॉवरकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थातून नाराची व्यक्त होत आहे.

सोनुर्ली गावासाठी पाच वर्षांपूर्वी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात आला. गावात नसलेली मोबाईलची रेंज या निमित्ताने आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. मात्र, हा आनंद काही महिन्यांसाठीच टिकला. कारण, या टॉवरसाठी आवश्यक असलेली बॅटरी बॅकअप केव्हाची चोरीला गेली असून बीएसएनएल अधिकाऱ्यांनाही याची कल्पना नाही. या टॉवरसाठी आलेली इलेक्ट्रिक केबल अंडरग्राउंड नसल्याने ती वारंवार कट होऊन या टॉवर बंद पडतो.

तसेच लाईट गेल्यावरही टॉवर बंद होतो एकूणच हातावर असून नसल्यासारखा आहे टॉवरच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे कंपाउंड किंवा डागबुजी केलेली नाही. झाडाझुडपानी वेढलेल्या स्वरूपात हा टॉवर असून त्याकडे बीएसएनएलचे अधिकारी पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जनरेटर बसवण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये डिझेल टाकून तो कधीच कार्यान्वित करण्यात आला नाही. केवळ निधी खर्च करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून झाले आहे. त्यामुळेच हा टाॅवर एक तर व्यवस्थित कार्यान्वित करा अन्यथा तो कायमचा बंद करा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावामध्ये खाजगी कंपनीचा ही दुसरा टॉवर आहे. परंतु बीएसएनएल टाॅवर असल्याने ग्रामस्थ मोबाईल रिचार्ज करतात. परंतु टॉवरच बंद असल्याने मोबाईलचे रिचार्ज फुकट जाते. त्यामुळे ग्रामस्थातून याबाबत प्रचंड नाराजी आहे. तरी याबाबत बीएसएनएल अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सदरचा कार्यान्वित करावा अशी मागणी होत आहे.