
वेंगुर्ले : सर्व्हर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवण्याचे काम गेले ८ दिवस सशासनाकडून सुरू आहे. या प्रश्नावर आज (२९ जुलै) वेंगुर्ला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देत लक्ष वेधण्यात आले. शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाइन मिळत असलेल्या मार्जिन सहित ऑफलाइन धान्य देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे धान्य देण्याची व्यवस्था करावी असे न झाल्यास वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनात असे म्हटले आहे की, या महिन्याच्या 24 तारीखपासून सर्वर प्रॉब्लेममुळे धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. यामुळे सामान्य गरजू रेशन धारकांना दिवसातून चार वेळा दुकानात येऊन जावे लागत आहे. शासनाने ऑफलाइनची सुविधा ही पूर्णपणे बंद केलेली आहे. धान्य वितरणासाठी फक्त तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत या दिवसात कशा पद्धतीने धान्य वाटप करायचे? कारण अद्याप पर्यंत सर्व्हर सुरू झालेला नाही. या दोन दिवसात २ दिवसात सर्व्हर सुरू न झाल्यास सरासरी आपल्या तालुक्यातील सर्व धान्य दुकानाचे ७० ते ८०% लोक धान्यापासून वंचित राहतील. ही गांभीर बाब आहे.
तरी आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस सर्व्हरची अशी परिस्थिती शेवटच्या पंधरवड्यात निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाइन मिळत असलेल्या मार्जिन सहित ऑफलाइन धान्य देण्याच्या लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास वेंगुर्ला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष विधता सावंत, महिला तालुकाध्यक्ष दीक्षा पालव, सरचिटणीस मयूर आरोलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश पालव, अंकुश मलबारी, अनुराधा वेर्णेकर, अब्दुल शेख यांच्यासाहित इतर पदाधिकारी उपस्थित होते.