देशात राज्यघटना बदलण्याचा घाट : अर्चना घारे - परब यांचा आरोप

Edited by: विनायक गावस
Published on: April 15, 2024 06:12 AM
views 152  views

सावंतवाडी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी महाविकास आघाडीच्यावतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. दूरदृष्टी ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून केले. जगातील या सर्वश्रेष्ठ राज्यघटनेची आज पायमल्ली होत आहे. ती होता कामा नये. अशा प्रकारच्या भावना यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केल्या. 

तर यावेळी महामानवाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब म्हणाल्या की, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली राज्यघटना बदलण्याचा घाट सध्या घातला जात आहे. त्यासाठी 400 पार चा नारा दिला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेली जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही आज धोक्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. आपल्या राज्यघटनेवरील लोकशाही वरील हा हल्ला परतवून लावण्यासाठी आपण सज्ज होऊयात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारत संविधानाने दिलेल्या मार्गाने उभा करूयात असं मत व्यक्त केले.


यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा बॅक माजी संचालक विकास सावंत, शिवसेना  ( ऊ.बा.ठा.) तालुका प्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, शहर अध्यक्ष अँड. सायली दुभाषी, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, सोशल मिडीया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष संजय भाईप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष ऋतिक परब, युवती कुडाळ तालुका अध्यक्ष स्वाती पालयेकर, युवती उपाध्यक्षा राधीका धुरी, सरचिटणीस विषाखा नाईक उपस्थित होते. तर नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळूंखे , समाजमंदिर समन्वय समिती अध्यक्ष केशव जाधव, सचिव विनायक जाधव, कांता जाधव, सगुण जाधव, कविता निगुड़कर आदीनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.