
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग, चौकुळ, आंबोली या परिसरात हत्ती, गवे रेडे, माकड, केलडी, डुक्कर इत्यादी जंगली प्राण्यांपासून शेतक-यांच मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसान पहाता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह यावर उपाययोजना करण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याबाबत राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच लक्ष वेधल आहे.
सावंतवाडी मतदारसंघातील दोडामार्ग,चौकुल,आंबोली हा संपूर्ण परिसर निसर्गसंपन्न असून येथील अर्थव्यवस्था ही भात शेती व बागायतीवर अवलंबून आहे. येथील भूमिपुत्रांनी मोठ्या कष्टाने जमिनींमध्ये फळबागा विकसीत केल्या आहेत. परंतू सध्या या सर्व शेती व बागांना हत्ती, गवेरडे, माकड, केलडी, डुक्कर इत्यादी जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवत आहेत. येथील शेतकरी हा आर्थिकदृष्टया संपन्न नाही. परंतू मिळेल त्या उत्पन्नावर आपली उपजिवीका करीत आहे.आधीच दरवर्षी येणारी वादळे,अतिवृष्टी यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यात आता या प्राणीसंकटाची देखील भर पडली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचा परिसर हा डोंगरद-यांनी वेढलेला आहे. मुबलक पाणी, वाढलेली झाडी, शेती व फळबागायतीपासून मिळणारे शास्वत कायमस्वरुपी अन्न हे रानटी प्राणी स्थिरावण्याचे प्रमुख कारण आहे.विशेषतः हत्तींचे आगमन झाल्यापासून हत्ती नारळ, सुपारी, केळी, बांबू इ. बागायतीचे मोठया प्रमाणात नुकसान करतात. काहीवेळा मनुष्यावरही जीवघेणा हल्ला करतात. शिवाय नुकसान भरपाई ही तुटपूंज्या स्वरुपात मिळते. त्यामूळे हत्तीना मूळ त्यांच्याच अधिवासात म्हणजेच कर्नाटक राज्यात पुन्हा सोडणेच योग्य आहे.तसेच इतर जंगली प्राण्यांसाठी वनविभागाच्या परिसरामध्ये पानवठे निर्माण केल्यास ते परिसरातील शेतीचे नुकसान करणार नाही. अशा उपायोजना होणे आवश्यक आहे. हा प्रश्न या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने याबाबत विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडावी. अशी मागणी अजित पवार यांच्याकडे अर्चना घारे-परब यांनी केली"हा प्रश्न गंभीर असून याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागास तात्काळ कारवाईसाठी पाठवण्यात येईल तसेच विधिमंडळात देखील या बाबत संबंधित मंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे" अजित पवार यांनी यावेळी सांगितले.