
वैभववाडी : खारेपाटण–गगनबावडा मार्गावरील उंबर्डे व तिरवडे तर्फे खारेपाटण या दोन ठिकाणी कालव्याच्या ठेकेदाराने बांधकाम विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्ता खोदल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाने पोलीस व तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून पुढील कारवाईची मागणी केली आहे.
सध्या अरूणा प्रकल्प अंतर्गत कालव्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे करताना संबंधित ठेकेदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी यापूर्वीही वारंवार झाल्या आहेत. रस्ते खोदताना संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही ती न घेता कामे केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.काही दिवसांपूर्वी मांगवली येथे देखील अशाच प्रकारे रस्ता खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी कामाला विरोध करून ते तात्पुरते थांबवले होते. त्यानंतरही ठेकेदाराने धडा न घेता सात–आठ दिवसांपूर्वी खारेपाटण–गगनबावडा मार्गावर उंबर्डे व तिरवडे तर्फे खारेपाटण येथे रस्ता खोदून जलवाहीनीचे काम पूर्ण केल्याचे समोर आले आहे.तसेच कोळपे कब्रस्तान येथे बाजू पट्टी खोदली आहे.
या प्रकारामुळे रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली असून वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नव्याने काम केलेल्या मार्गावर खोदाईमुळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेया प्रकरणाची दखल घेतली असून याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशीही पत्रव्यवहार करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, रस्ता खोदण्यापूर्वी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट होत असून, संबंधित ठेकेदारावर नियमभंगाची कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.










