
सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील ९ हजार ९६७ घरकुल मंजूर झोलेले आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील मंजूरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण देखील करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या प्रसारणाची देखील व्यवस्था उपस्थितांसाठी करण्यात आली होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सर्वसमान्य माणूस नेहमी स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न आज प्रधानंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जय कुमार गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले असल्याने मी त्यांचे मनापासून आभार मानतो. गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशापर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सूचित केले. या कार्यात ग्रामसेवक आणि तलाठी यांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांनी समर्पकपणे काम करावे. जेवढ्या तत्परतेने ते काम करतील, जेवढा जास्त वेळ ते या कामासाठी देतील तेवढे लवकर उद्दिष्ट पुर्ण होईल. जोपर्यंत लाभार्थ्यांच्या घरापर्यंतचा प्रवास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पालकमंत्री म्हणून तुमच्या सोबत असणार आहे. या कार्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर माझ्याशी संपर्क करा मी पालकमंत्री म्हणून सदैव तुमच्यासोबत आहे असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास घरकुला योजना महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे घर मिळणार आहेत. मंजुर झालेली सर्व घरकुल पावसाळ्याची आधी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य असून ते वेळेत पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले.