अधीक्षक अभियंता कार्यालय स्थापनेसह पदरचनेला मान्यता !

२५ पदे मंजूर !
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 03, 2024 07:10 AM
views 132  views

कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण अंतर्गत अधीक्षक अभियंता कार्यालय सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. त्यादृष्टीने कार्यालय स्थापन करण्यास तसेच अधीक्षक अभियंत्यांसहीत पदरचनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्गमधील अधीक्षक अभियंता कार्यालयात एकूण २५ पदे मंजूर करण्यात आलेली आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरिक, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांना तक्रारी, निवेदन सादर करण्यासाठी रत्नागिरी येथे लांब प्रवास करावा लागतो. तसेच पाठपुरावा करणे शक्य होत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग असल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवणेही कठिण होते, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन झाल्यास वेळ व इंधनाची बचत होणार आहे. तसेच प्रशासकीयदृष्ट्या कारभार गतीमान होण्यासाठीही या कार्यालयाची मदत होणार आहे.

दरम्यान, कोकण विभाग अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयासाठी २५ पदांची आवश्यकता आहे. याकरीता मुख्य अभियंता कोकण विभाग अंतर्गत असलेल्या ३ उपविभागांचे रुपांतर अनुक्रमे जिल्हा प्रयोगशाळा ठाणे, पालघर व सिंधुदुर्गमध्ये करण्यात आल्याने निरनिराळ्या संवर्गातील ३३ पदे अतिरिक्त ठरत होती. यापैकी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता अशी दोन पदे, वरिष्ठ लिपिक ३, कनिष्ठ लिपिक ३ अशी आठ पदे सिंधुदुर्ग कार्यालयासाठी वापरण्यात येणार आहेत.

याचबरोबर १० नियमित पदे व ७ मनुष्यबळ सेवा सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयाच्या कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात अधीक्षक अभियंता एक पद, उपअभियंता, लघुलेखक प्रत्येकी एक पद, कनिष्ठ अभियंता दोन पदे, प्रमुख आरेखक, लघुलेखक निम्न श्रेणी, अधीक्षक, प्रथम लिपीक, लघुटंकलेखक, सहाय्यक आरेखक यांचे प्रत्येकी एक पद, वरिष्ठ लिपीक ४ पदे, कनिष्ठ लिपीक ५ पदे, वाहन चालक एक, शिपाई ३ व चौकीदार १ अशी पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी कनिष्ठ लिपिक दोन, वाहन चालक एक, शिपाई ३ व चौकीदार १ अशी सात पदे बाह्ययंत्रणेमार्फत घेण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्गमधील मंडळ कार्यालय अर्थात अधीक्षक अभियंता कार्यालयातंर्गत कणकवली विभागातील उपविभाग देवगड, कणकवली क्र. १ व २, वैभववाडी व मालवण तर सावंतवाडी विभागातील उपविभाग कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग यांचा समावेश असणार आहे.