
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगरसेवक नासीर शेख आणि शिवसेनेचे अर्चित पोकळे यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ही माहिती दिली.
नासीर शेख यांनी प्रभाग क्रमांक १ ब मधून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्चित पोकळे यांनी प्रभाग क्रमांक ६ ब मधून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. श्री पोकळे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या शब्दांचा आदर ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे असे सांगितले. या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आता उद्या २१ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे.










