कोकण विभाग पदवीधर मतदार नोंदणीसाठी तहसिलदार पवार यांचे आवाहन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 12, 2023 19:46 PM
views 364  views

 देवगड : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुरु असून यासाठी १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी शिक्षण पूर्ण झालेले व्यक्ती मतदार म्हणून नाव नोंदणी करु शकतात. तरी देवगड तालुक्यातील अशा व्यक्तीनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पात्र पदवीधर मतदाराचे वय १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तो मतदार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेचा पदवीधर आवश्यक आहे. मतदार नोंदणी करताना नमुना नंबर १८ भरणे आवश्यक आहे. त्यासोबत एक पासपोर्ट साइज कलर फोटो, पदवी गुणपत्रक / पदवी प्रमाणपत्र (convocation certificate), आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड किंवा लाईट बिल, नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. नमुना-१८ सोबत सादर करण्यात येणारे पुराव्याचे कागदपत्र हे पदवीधर मतदार यांनी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वयंसाक्षांकीत करुन अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांच्या कडून प्रमाणित करुन घ्यावेत. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त कोंकण विभाग यांनी सुरज कांबळे- मुख्याधिकारी नगरपंचायत देवगड-जामसंडे व जयप्रकाश परब – गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांची अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी पदवीधर मतदार निवडणूकीकरीता मतदार नोंदणी करणारे मतदार यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत देवगड-जामसंडे व गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांच्या समक्ष मूळ कागदपत्रे दाखवून त्यांच्या झेरॉक्स प्रती सत्यप्रत करुन घेणे आवश्यक आहे.

तसेच पात्र मतदार हे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर मतदार नोंदणी करु शकतात. पदवीधर मतदार नोंदणीकरीता आवश्यक नमुना १८ तहसिलदार कार्यालय देवगड येथील निवडणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.