
देवगड : तौक्ते चक्रीवादळ झाल्यापासून आंबाबागेत फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. आंबा फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंब्याची प्रत घसरली असून विक्री व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे आर्थिक नुकसान लक्षात घेता “सिंधुरत्न समृद्धी योजना” अंतर्गत आंबा पिकावरील फळमाशीचे सामूहिकपणे नियंत्रण करण्यासाठी 75 टक्के अनुदानावर प्रति हेक्टरी 4 फेरोमोन सापळे आणि 4 लुर्स अनुदानावर देण्यात येणार आहे.
फेरोमोन सापळे आणि लुर्स हे आंबा बागायतदारांनी सामूहिकपणे आपल्या आंबाबागेत लावायचे आहे. जेणेकरून सामूहिक स्वरूपात फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होऊन फळमाशीचे नियंत्रण आटोक्यात येण्यासाठी मदत होईल. प्रस्तुत फेरोमोन सापळे आणि लुर्सची मागणी करण्यासाठी गावाच्या संबंधित कृषी सहाय्यक यांना संपर्क करून त्यांच्याकडे आपला मागणी अर्ज सादर करावा. या अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. तरी सर्व आंबा बागायतदारांनी आपण व आपल्या परिसरातील सर्व आंबा बागायतदार यांना फेरोमोन सापळे व लुर्सची मागणी करण्यासाठी अर्ज करण्याबाबत अवगत करावे, जेणेकरून आंबा बागेच्या 100 % क्षेत्रावर सामूहिकपणे फेरोमोन सापळे आणि लुर्सचा वापर केल्यास फळमाशीचे नियंत्रण करण सोपे होईल. या योजनेचा सर्वांनी लाभ सर्व आंबा बागायतदार यांनी घ्यावा असं आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडून करण्यात आल आहे.