
कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी बुधवार, ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदारयाद्या तहसील कार्यालय कणकवली, पंचायत समिती कार्यालय कणकवली व सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गट व गणनिहाय प्रारूप मतदारयाद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालय व पंचायत समिती कार्यालयामध्ये सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत.
सदर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. ८ ते दि. १४ ऑक्टोबर असा आहे. कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येतील, असे कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले आहे.










