तुमची तातडीची मदत तन्मयला देईल नवसंजीवनी

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त
Edited by: विनायक गांवस
Published on: April 04, 2026 15:32 PM
views 399  views

दळवी कुटुंबियांचं मदतीचं आवाहन 

सावंतवाडी : किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सावंतवाडीतील तन्मय कृष्णा दळवी या अवघ्या साडेसात वर्षाच्या चिमूरड्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी २ लाखाची गरज आहे. पैशाअभावी ही शस्त्रक्रिया थांबली असून आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे दळवी कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे. ही तातडीची मदत तन्मयला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा आधारही वाचणार आहे.

       

तन्मय दळवी मिलाग्रिस मराठी प्रायमरी स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत आहे. दोन महिन्यापूर्वी त्याच्या पोटात अचानक दुखू लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर तसेच गोवा येथे नेल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या पूर्ण क्षमतेने कार्य करत नसल्याचे निदान झाले. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही किडण्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न त्यांना पडला आहे. तन्मयचे वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. आतापर्यंत तन्मयच्या उपचारासाठी दळवी कुटुंबियांनी होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे सध्या या चिमुरड्या चिन्मयसह त्याच्या आईवडिलांची स्थिती पाहिल्यावर कुणालाही गहिवरून येईल. त्यामुळे तन्मय याच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या आधारासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. तन्मयच्या पुढील उपचारासाठी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे.

ज्यांना तन्मय याच्या उपचारासाठी मदत करावयाची आहे त्यांनी तन्मय कृष्णा दळवी नमिता कृष्णा दळवी संयुक्त खाते नंबर १४१०११६१००००४९३ आय एफ एस सी कोड बी के आय डी ०००१४१० बँक ऑफ इंडिया शाखा, सावंतवाडी या खात्यावर जमा करावी तसेच अधिक माहितीसाठी कृष्णा दळवी 8879913798 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.