
सावंतवाडी : उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडीची प्रशिक्षणार्थी कुमारी अन्विता अनाजी सावंत हिची 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारात पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. नुकतीच पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र एअर अँड फायरआर्म शूटिंग कॉम्पिटिशन 2025 संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यात सिंधुदुर्गातील नेमबाज सहभागी झाले होते. कणकवली भिरवंडे येथील खेळाडू कु.अन्विता अनाजी सावंत हिने 10 मिटर एअर पिस्तूल शूटिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिची गोवा येथे होणाऱ्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशीप तसेच अहमदाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिया जी.व्ही मावळणकर शूटिंग चॅम्पियनशीप साठी निवड झाली आहे. ती सेंट उर्सूला स्कूल, वरवडे या प्रशालेची विद्यार्थिनी असून ती उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी येथे नेमबाजीचा सराव करत आहे. तिच्या या यशामध्ये तिचे प्रशिक्षक कांचन उपरकर यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच सेंट उर्सूला स्कूलच्या माननिय प्राचार्या सिस्टर जान्सी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या सर्वांनी तिला गोवा येथे होणाऱ्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.