मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमणाविरोधात ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ आणणार

महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Edited by: विनायक गांवस
Published on: December 19, 2024 17:26 PM
views 185  views

सिंधुदुर्ग : राज्यात देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी चांगली आहे. या विषयांवर लक्ष देऊन सरकार कारवाई करेल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्ट मंडळाने नागपूर विधान भवनात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी मागणी करण्यात आली.

मंदिरांच्या समस्यांबाबत शिष्टमंडळाशी बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंदिरांच्या जमिनींवर होणार्‍या अतिक्रमणाबाबत सरकार गंभीर आहे. या संदर्भात सरकार लक्ष घालून त्वरित कारवाई करेल. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे निमंत्रण देण्यात आले. महाराष्ट्रात अमरावती येथील सोमेश्वर देवस्थानची ५० कोटी रुपयांची जमीन केवळ ९६० रुपयांना, अकोला येथील बालाजी देवस्थानची ३० कोटी रुपयांची जमीन फक्त १० हजार रुपयांना, तसेच अमरावती येथील श्री कालेश्वर देवस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल भावाने विकण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे सर्व प्रकार सरकारी अधिकारी आणि लँड माफिया संगनमताने करत आहेत. यात दोषींवर कठोर कारवाई होत नाही. केवळ दिवाणी खटल्यांमध्ये खूप वेळ लागत असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. गुजरात, ओडिशा, कर्नाटक, आसाम आदी राज्यांमध्ये ज्या प्रकारे मंदिरांच्या शेतजमिनी बळकावण्याच्या विरोधात कठोर ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही असा कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आली.

यावेळी महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, महासंघाच्या राज्य कोअर कमिटीचे सदस्य अनुप जयस्वाल, नागपूर येथील श्री बृहस्पती मंदिराचे विश्वस्त तथा मंदिर महासंघाचे विदर्भ संयोजक रामनारायण मिश्र, ‘श्री पंचमुखी हनुमान मंदिरा’चे विश्वस्त तथा मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा संयोजक दिलीप कुकडे, नांदेड येथील वजीराबाद हनुमान मंदिराचे गणेश महाजन, अहिल्यानगर येथील श्री भवानीमाता मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता अभिषेक भगत, अमरावती येथील श्री पिंगळादेवी संस्थानचे विनीत पाखोडे, भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष रवी ज्ञानचंदानी, नागपूर येथील हिलटॉप दुर्गामाता मंदिराचे पुजारी प्रदीप पांडे, नागपूर येथील श्री सिद्धारूढ शिव मंदिराचे प्रकाश तपस्वी, हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, समितीचे नागपूर समन्वय श्री. अभिजित पोलके आणि इतर मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.