
दोडामार्ग : गोवा मुक्ती लढ्याच्या 61 व्या वर्धापन दिनी आज सोमवारी सकाळी गोवा हद्दीतील साळ - खोलपेवाडी या ठिकाणच्या पोर्तुगीजकालीन ध्वजस्तंभावर दोडामार्गातील व्यापारी, नागरिक, लोकप्रतिनिधी, भारत माता की जय संघटनेचे पदाधिकारी तसेच गोवा मुक्ती लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या दोडामार्गातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय यांनी तिरंगा फडकावला. या ध्वजस्तंभावर तब्बल 61 वर्षांनी तिरंगा फडकला.
पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त झाल्याचे वृत्त दोडामार्गात पोहचताच दोडामार्ग नजीकच्या गोवा हद्दीतील साळ गावाच्या सीमेवर असलेल्या पोर्तुगीज कालीन ध्वजस्तंभावरचा त्यांचा ध्वज उखडून टाकण्यात आला. त्या जागी भारताचा तिरंगा डौलाने फडकवला होता. त्याला आज 61 वर्ष पूर्ण झाली. गोवा सरकारकडून हा ध्वजस्तंभ गोवा मुक्ती लढ्यातील स्मारक / खूण विकसित करण्याची मागणी व्यक्त होते आहे.
आज दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी व्यापारी, नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतलेल्या कुटुंबियांसमवेत या ठिकाणी ध्वजारोहण केले. गोवा सरकारने या ठिकाणी लक्ष देऊन हे स्थळ मुक्ती लढ्यातील एक स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी श्री. चव्हाण तसेच उपस्थित्तांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, श्रीमती उज्वला परब, कु. श्रेयान परब, सुधीर चांदेलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवु मिरकर, भारत माता की जय संघटनेचे वैभव रेडकर, सुमंत मणेरीकर, रजत राणे, देवानंद हजारे, भाऊ मणेरीकर, आनंद कामत, दिनकर उगवेकर, आत्माराम बोर्डेकर,स्वप्नील गवस, संदेश बोर्डेकर, सुधीर सावंत, समीर रेडकर आदी उपस्थित होते.