
दोडामार्ग : सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय कार्यालयाचे उप विभागीय अभियंता अधिकारी अनिल बडे यांना दोडामार्ग पत्रकार संघाचा यावर्षीचा 'उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात स्थानिक आमदार व मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत या पुरस्कारराचे वितरण होणार आहे, अशी माहिती पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई व सचिव गणपत डांगी यांनी दिली आहे.
लोकशाहीत लोकसेवकांनी आपल कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. जनतेला अपेक्षित काम पूर्णात्वास जातात. असंच कर्तव्य दोडामार्ग तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागात उपअभियंता म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर खऱ्या अर्थाने दोडामार्ग बांधकाम विभागाच्या विकासकामांना अनिल बडे यांनी गती दिली. दोडामार्ग ते बांदा, दोडामार्ग ते तिलारी राज्यमार्ग नूतनीकरण, रस्ता रुंदीकरण, दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय, तालुका क्रिडांगण, राज्यमार्गवरील पूल, हेवाळे पूल, बांधकाम विभागाची इमारत शिवाय अनेक मंजूर विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. दोडामार्ग शहर बाजारपेठ परिसरात सुद्धा रस्ता रुंदीकरण, हॉस्पिटल ते मणेरी रस्ता रुंदीकरण अशी कामे पुर्ण करण्यात त्यांनी योगदान दिले. याचीच दखल घेत उत्कृष्ट प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल समितीने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात कोकणसादचे प्रतिनिधी लवू परब यांना उदयोन्मुख पत्रकार तर प्रभाकर धुरी यांना उत्कृष्ट पत्रकार उद्योजक राजू भोसले, बाबा टोपले यांना यशस्वी उद्योजक तर प्रशासकीय अधिकारी अनिल बडे यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात अध्यक्ष संदीप देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी समितीची बैठक झाली. यावेळी सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष तेजस देसाई, खजिनदार रत्नदीप गवस, प्रभाकर धुरी, वैभव साळकर, लखू खरवत, संदेश देसाई, समीर ठाकूर, लवू परब आदी उपस्थित होते.