संतप्त पालकांची मुलांसह मालवण पं. स. ला धडक !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 17, 2023 14:02 PM
views 190  views

मालवण : मालवण तालुक्यात अनेक प्राथमिक शाळांमध्ये रिक्त शिक्षक प्रश्न गंभीर बनला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान पाहता कातवड खैदा प्राथमिक शाळा येथील संतप्त बनलेल्या पालकांनी मुलांसह मालवण पंचायत समितीत धडक दिली. त्या ठिकाणी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने पालक अधिकच आक्रमक बनले.

आमच्या शाळेतील शिक्षक मसुरे शाळेत कामगिरीवर पाठवले. आमच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उपस्थित अधिकारी यांनीही गटशिक्षणाधिकारी फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागात मुलांना बसवून शाळा सुरु केली. मुळे पाढे म्हणत तसेच अन्य अभ्यास करत होती. आमच्या शाळेत नियुक्त असलेल्या शिक्षक यांना ज्या शाळेत कामगिरीवर पाठवले तिथून पुन्हा आमच्या शाळेत नियुक्त केल्या शिवाय आम्ही निघणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

यावेळी सरपंच सिया धुरी, सदस्य नंदा बावकर पालक ग्रामस्थ मंगेश नलावडे, गणेश कांबळी, यशवंत चव्हाण, सूर्यकांत कदम, सुनील आचारेकर, संदीप आचरेकर, सचिन कांबळी, मोहन आचारेकर, राजू धुरी, किशोर पवार, अमोल वस्त, गुरु नलावडे, सेजल पवार, साक्षी आचरेकर, समृद्धी वस्त, संतोष चव्हाण, गणेश नलावडे, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, छोटू सावजी आदी उपस्थित होते.