आसोलीतील संतप्त शेतकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Edited by: दिपेश परब
Published on: June 09, 2024 13:54 PM
views 251  views

वेंगुर्ला : गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आंदोलनाचा इशारा देत शेतकऱ्यांचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. भर बांधावर, भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा हा प्रवेश पार पडला. 

तालुक्यातील आसोली गावच्या सक्राळ वाडीमध्ये पन्नास एकर क्षेत्र सुपीक जमीन आहे. त्याच्या शेजारी ओहोळ वाहत आहे. त्या ओहोळाचे पाणी पाऊस पडल्यानंतर शेतीमध्ये येऊन शेती करण्यासाठी व्यत्यय येतो. त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांच होते. त्यांच्या उपजीविकेचे साधनच शेती आहे. आठ वर्षे प्रस्ताव, पाठपुरावा करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकप्रतिनिधींकडून देखील दखल न घेतली गेल्याने शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केला. यावेळी अर्चना घारे परब यांचे काम बघता त्यांच्या मागे आम्ही उभे राहीले आहोत. त्या आमच्या शेतकरी बांधवांना न्याय देतील, त्यांच्यासाठी लढतील असा आम्हाला विश्वास आहे असे मत प्रवेश करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले. यावेळी अर्चना घारे परब म्हणाल्या, शेतकरी शरद पवार यांच्या नेतृत्वावर आकर्षित होत आहेत.हा राष्ट्रवादी परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे. आमच्या परिवारात शेतकरी  बांधवांच स्वागत करते. यापुढे तुमची अडचण ती आमची अडचण आहे. तुमच्यासाठी उपोषण करू, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. पण, शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देऊ. शेतकरी नाराज आहेत. ८ वर्ष सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत ते आहेत. अन्याय होत असताना अधिकारी, प्रशासनाला जाग येत नाही. न्याय मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी बांधावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ, सरकारला कशी जाग येत नाही ते बघू असा इशारा   अर्चना घारे परब यांनी यावेळी दिला. 

यावेळी आसोलीतील रिया धुरी, प्रिया नाईक, हनुमंत धुरी, वसंत धुरी, मिलींद नाईक, लक्ष्मी मेस्त्री, नारायण मेस्त्री, उमेश धुरी, सिताराम सडेकर, रवी धूरी, हर्षदा धुरी, महादेव धुरी, महानंदा नाईक, सेजल नाईक, विलास मेस्त्री, रमेश भानजी, संजय भानजी, नंदकुमार भानजी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी सावंतवाडी माजी सभापती जगन्नाथ डेगवेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब, ओबिसी अध्यक्ष सचिन पेडणेकर, आसोली विभाग प्रमुख बंटी कांबळी, तुळस विभाग प्रमुख अवधूत मराठे, उमेश कुंभार, प्रशांत नाईक, सुरभा धुरी, मोहन जाधव, नारायण करेलकर, उदय कांबळी, देवेंद्र देऊलकर यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.