अन् जयवंतच्या पंखात आले सकारात्मक बळ!

वर्गमित्र, सामाजिक बांधिलकीची विधायक कामगिरी
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 01, 2023 15:31 PM
views 405  views

सावंतवाडी : जयवंत सुधाकर केरकर..राहणार पिंपळवाडी, मळगांव... पत्रकार सचिन रेडकर यांचे वर्गमित्र...पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होते.आपल्या नोकरीत व्यवस्थित कार्यरत असताना आणि अत्यंत सुख समाधानाने प्रपंच चालत असताना चार वर्षांपूर्वी अचानक त्यांना  पॅरेलिसीस झाला. ज्यामुळे तब्बल दोन वर्ष जयवंत बेडवरच होते. या दरम्यान स्थानिक ग्रामस्थ, पिंपळवाडीतील शेजारी, मित्र, नातेवाईक तसेच गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी त्यांना आर्थिक मदत केली. औषधोपचार झाले. आज जयवंत उभे राहतात व काठी घेऊन चालतात. आई, वडील, पत्नी व दोन छोट्या मुली त्यांना आहेत. दोन भाऊ मुंबईला नोकरी निमित्त राहतात.

गेल्या वर्षी त्यांच्या १९८९ दहावी बॅचचे गेट-टुगेदर झाले. सर्व वर्गमित्रांनी खर्चासाठी जी रक्कम काढली होती त्यातून २५ हजार शिल्लक राहिले. काही जणांच मत होते की ते शाळेला मदत म्हणून द्यावे. मात्र संवेदशील व्यक्तिमत्व असलेले पत्रकार सचिन रेडकर यांनी सुचवलं की आपल्याच एका मित्राला त्याची अत्यंत गरज असून त्याला त्याच्या पायावर उभा करण्यासाठी आपण मदत करू या! रेडकर यांच्या या सूचनेला जमलेल्या सर्व वर्ग मित्रांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि यातूनच जयवंत केरकर यांना कटलरी दुकान घालून देण्याचा विचार मित्रांच्या मनात आला. खर्च मोठा होता आणि वर्गमित्रांकडे फक्त २५ हजार होते. पुन्हा सर्व वर्ग मित्रांना रेडकर यांनी आवाहन केलं. त्यातून रक्कम उभी झाली. यात सर्व क्लासमेट, शिक्षक वृंद व मित्रांनी आर्थिक हातभार लावला.

 या दरम्यान सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी तेवढ्या रकमेत दुकान तयार करून दिलं. काही रकमेचे सामान खरेदी करून सुरुवातीसाठी केरकर यांना दिले. जयवंत यांच्या  वाढदिवसाच्या मुहर्तावर दुकान उभे राहिले, आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभमुहूर्तावर दुकानाचे उद्घाटन झाले. मात्र दुकान पाहिजे तसे विक्री करण्यासाठी सज्ज झाले नाही. कारण दुकानात पुरेसे  साहित्य नव्हते.

मात्र नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर रविवारी १ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून आईस्क्रीम कूलर (डीप फ्रीज) जयवंतला दुकानात ठेवण्यासाठी भेट देण्यात आला. सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी त्यासाठी सुरुवातीचचे  आईस्क्रीम दिले. तसेच बिस्कीट, केक, वेफर्स व अन्य खाद्यपदार्थ व इतर  वस्तूही देण्यात आल्या. 


आता खऱ्या अर्थाने नववर्षाच्या प्रारंभी या दुकानाचे उद्घाटन झाले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जयवंत आणि त्याच्या कुटुंबियांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून त्याला मदत करणाऱ्या सर्व मित्रांना आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना मनोमनी समाधान वाटले.

    या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल परुळेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकी संघटनेचे अध्यक्ष रवी जाधव, प्रदीप कांबळे,  फ्रान्सिस रॉड्रिक्स, हेलन निब्रे, समीरा खलील,

मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते तथा जयवंतचे मित्र महेश खानोलकर, पत्रकार सचिन रेडकर, सतीश राऊळ, देवानंद राऊळ, दादा राऊळ, संदीप केरकर, अजित सातार्डेकर, राजू नाईक, देवदास नाईक, उदय हरमलकर, निलेश राऊळ आदींसह स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .