३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या औचित्याने आनंदोत्सव

Edited by:
Published on: January 09, 2024 16:57 PM
views 63  views

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने 15 ते 19 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत ओरोस, सिंधुदुर्ग येथे  ‘आनंदोत्सव’  साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र,  सरस्वती एज्युकेशन सोसायटी, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, जिजामाता फळ प्रक्रिया समूह व सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘आनंदोत्सव’  जिजमाता प्रक्षेत्र ओरोस येथे साजरा करण्यात येणार आहे.

शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. असे स्वराज्य की जिथे सर्वांना आनंद मिळाला. खऱ्या अर्थाने “जय जवान जय किसान” हे राज्य त्यांनी निर्माण केले. त्यातून आजचा समर्थ भारत निर्माण झाला. आजचा भारत शिवरायांच्या तत्त्वावर उभे करण्याचे काम आपल्या सर्वांना करावयाचे आहे. हा या ‘आनंदोत्सवाचा’ मुख्य उद्देश आहे. आजच्या भारतात सर्वात दुःखी समाज म्हणजे शेतकरी आहे. शिवरायांनी जसे प्राधान्य शेतकऱ्यांना दिले तसेच प्राधान्य सरकारने दिले पाहिजे. म्हणूनच आम्ही नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले. मी स्थापन केलेल्या कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गने 7 वर्षे नैसर्गिक शेती प्रसारासाठी अथक प्रयत्न केले असून, याकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळत आहेत. तसेच येत्या तीन वर्षात 15000 एकर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. सरकारने स्थापन केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आम्ही अंमलबजावणीची करत आहोत.

नैसर्गिक शेतीची अंमलबजावणी झाल्यानंतर समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प आम्ही सुरू केला. भारतातील प्रत्येक गाव समृद्ध आणि आनंदी असेल तर भारत समृद्ध आणि आनंदी होईल. या तत्त्वावर ‘आनंदोत्सवाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत. यामध्ये नैसर्गिक शेती, आरोग्य, उद्योग, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, पर्यावरण, स्वच्छता, पर्यटन, प्रदर्शन व वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण इत्यादी प्रमुख घटकांचा समावेश आहे. थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यावर्षीच्या कृषि भारत रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाजी स्मारक मंडळाने उभारलेल्या आरोग्य भवन व हॉस्पिटलचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात येणार आहे. नैसर्गिक शेती चे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.