
कुडाळ : कुडाळ शहरातील जिजामाता चौकासमोरील झाड अज्ञात व्यक्तीने तोडले. हे झाड त्याखाली असणाऱ्या स्टॉलवर पडल्याने गरीब स्टॉल व्यावसायिकाचे नुकसान झाले. ही गोष्ट कानावर येतात कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गरीब स्टॉल व्यवसायिकाला आर्थिक मदत सुपूर्त केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुडाळ जिजामाता चौकासमोरील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेले झाड अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने तोडले. यावेळी कविलकट्टा येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या मालकीच्या असणाऱ्या स्टॉलवर हे झाड पडले. त्यामुळे पेडणेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच पेडणेकर यांना धीर देत त्यांना तत्काळ आर्थिक मदत सुपूर्त केली. संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली असून कुडाळ शहरात असे विकृत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
यावेळी नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर, शिवसैनिक प्रथमेश कांबळी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.










