
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवसा पासून पाऊस सुरू झाला असून आज सकाळी ८:३० च्या सुमारास वेंगुर्ला शहरातील पिराचा दर्गा येथे असलेले मोठे जुने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबासहित विद्युत तारा तुटून नुकसान झाले आहे.
दाभोली नाका येथून पिराच्या दर्ग्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड होते. हे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी १२.३० पर्यंत बंद होती. तर येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. यामुळे वीज वितरणचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सकाळी झाड कोसळले त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
दरम्यान आंब्याचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळल्याने विद्युत खांबांचे तसेच रस्त्यालागत असलेल्या छोट्या दुकानाचे, मोबाईल शॉपीच्या डिजिटल फलकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत माहिती मिळताच नगरपरिषद कर्मचारी, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी व वाहतूक पोलीस परुळेकर, होमगार्ड घटनास्थळी झाले. वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.