बेटी पढावसाठी बोडदेच्या शाळेच्या शिक्षिका पूनम खोराटे यांचा अभिनव उपक्रम

Edited by: संदीप देसाई
Published on: August 17, 2023 20:16 PM
views 95  views

दोडामार्ग : पंतप्रधान मोदी यांनी 'बेटी बचाव बेटी पढाओ' ची घोषणा केल्यानंतर हे अभियान संपूर्ण भारतात प्रभावीपणे राबविल जात आहे. असाच एक अभिनव उमक्रम  बोडदे प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.पूनम खोराटे राबवीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाने बोडदे शाळेच्या तीन मुली सावित्रीबाई दत्तक पालक योजनेतंर्गत गावकऱ्यांनी दत्तक घेतल्या आहेत.

      या योजनेमुळे जि. प. सिंधुदुर्गच्या खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपये भरल्यावर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम दत्तक मुलीला देण्यात येणार आहे. काही वर्षापूवी बोडदे गावाचे तत्कालीन पोलीस पाटील कै. चंद्रशेखर मोगरा नाईक यांनी दोन मुली दत्तक घेवून पाया रचला होता. तर आता ही परंपरा पुढे नेत मुंबई स्थित बोडदे गावचे प्रतिष्ठीत नागरिक मोहन अनंत गवस ( कै. अन्नपूर्णा अनंत गवस स्मरणार्थ ), लाडू वासुदेव मोरजकर, अर्जुन शंकर दळवी( कै. शंकर आपा दळवी स्मरणार्थ ) यांनी या योजनेसाठी तीन मुली दत्तक घेतल्या आहेत.

    मोहन गवस यांनी आपल्या आजी कै.अन्नपूर्णा अनंत गवस यांच्या स्मरणार्थ हि मुलगी दत्तक घेतली आहे. आम्ही भावंडानी नियमित शाळेत जावे म्हणून आमची आई आग्रही असायची, प्रसंगी आम्हांला धपाटे द्यायची. तिच्या त्या तळमळीने आज आम्ही सुखासमाधाने जीवन जगत आहोत. तिचीच आठवण म्हणून मी शाळेच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे, अशी प्रतिक्रिया मोहन गवस यांनी दिलीय.

शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून तीन मुली दत्तक घेणाऱ्या मोहन गवस, लाडू मोरजकर व अर्जुन दळवी यांच्या दातृत्वाबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं कौतूक केल जात आहे. या उपक्रमाला हातभार लावणारे गावचे तिन्ही दानशूर सुपुत्र व या अभियान साठी विशेष मेहनत घेणाऱ्या शाळेचे शिक्षक यांचे शाळा व्यव .समिती अध्यक्ष साक्षी संदीप नाईक ,उपाध्यक्ष रुपाली प्रवीण गवस, रचना रामचंद्र घाडी, सुनील नाईक, फटी नार्वेकर, रमेश दळवी, श्रीकृष्ण गवस, रेखा गवस, नारायण गवस, महेश पारधी, चंद्रकांत जाधव, सुजाता गवस , दीपिका घाडी , महादेव गवस, दयानंद नाईक, गोविद नाईक तसेच मुख्या. महेश कृष्णा नाईक यांनी कौतुक केले आहे.  

उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक...

मुली वाचाव्या आणि त्या शिकाव्या यासाठी अनेक अभियान राबविली जातात, मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, लोकांची मानसिकता बदलावी, मुलगा- मुलगी असा भेदभाव करू नये यासाठी प्रचार व प्रसारही केला जातोय,  त्यांचा आवाज दाबला जावू नये, यासाठीही अनेक उपक्रम राबविले जावू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुली शिक्षणात मागे पडू नयेत यासाठी बोडदे शाळेच्या शिक्षिका पुनम खोराटे यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.