
सावंतवाडी : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करून रोहा ते मडुरा, सातोसे भाग मध्यरेल्वेत सहभागी करावा व सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी २२ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्याने केलेली आहे. कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निधीअभावी प्लॅटफॉर्मला शेड नाही. प्रवाशांना पावसात व उन्हात बसावे लागते. ब्रीज, सरकते जिने, पिण्याचे पाणी, स्पीकर, अस्वच्छ बाथरुम व रेल्वेचे दुहेरीकरण अशी अनेक महत्वाची कामे रखडलेली आहेत. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलिनीकरण केल्यास रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर करून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील. सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागेल तसेच या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे असा ठराव अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.