
सिंधुदुर्गनगरी : डॉ. बाबासाहेब लेले स्मारक समिती संचलित डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प, माणगाव यांनी गेल्या ३३ वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग, संशोधन आणि ग्रामविकासाचा भक्कम पाया घालत ग्रामीण अर्थकारणाला नवे बळ दिले आहे. १९९२ पासून प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली २१५ फळप्रक्रिया आणि ६५० काजू प्रक्रिया उद्योग उभे राहत ८ ते १० हजार रोजगारांची निर्मिती झाली, तर ८० हजार ते १ लाख शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळाली आहे. वर्षभरात साधारण ७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे यांनी दिली.
पत्रकार संघाची प्रकल्प भेट
जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या उपक्रमांतर्गत आज कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्रकल्पाला पत्रकारांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, खजिनदार गिरीश परब, सदस्य बाळ खडपकर, संदीप गावडे, विनोद दळवी, सतीश हरमलकर, मनोज वारंग आदी उपस्थित होते.
ग्रामविकासाची मजबूत पायाभरणी प्रकल्पाच्या माध्यमातून ११ शेतकरी गट, ४ दुध संकलन केंद्रे, १५ हजार लिटर क्षमतेचे शितकरण केंद्र उभारण्यात आले आहे. शिवाय २५ गावे ग्रामविकास संकुलात सामील असून दरवर्षी १५० ते २०० टन मुरघास निर्मिती होते.
संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग
काजू बोंडू, जांभूळ व आंबा पानांपासून जैव रसायने, सुगंधी द्रव्ये, नैसर्गिक रंग तयार करण्याचे संशोधन सुरू आहे. जांभूळ पानातील गॅलिक ॲसिड आणि आंबा पानातील मान्जिफेरिन काढण्याचे प्रगत तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. शिवाय पशुखाद्य पॅलेट निर्मितीवरही महत्त्वपूर्ण प्रयोग होत आहेत.
NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे वाटचाल
प्रक्रिया उद्योगांच्या गुणवत्तेसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली असून NABL मान्यता मिळाली आहे. लवकरच प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे उद्योजकांना चाचणीसाठी परजिल्ह्यात जाण्याची आवश्यकता उरणार नाही. भविष्यात मुंबईतील ICT सोबत सामंजस्य कराराद्वारे अनेक संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत.
प्रकल्पातील दर्जेदार उत्पादने – जिल्ह्याची ओळख
कोकम सरबत, आगळ, आमरस, काजूगर, फणस भाजी, आंबा–जांभूळ पोळी, आवळा उत्पादने, गाडूळ खत, गोमय साबण, गोमुत्र अर्क यांसह अनेक ग्रामीण उत्पादने बाजारात लोकप्रिय होत आहेत.
उद्योजक घडविण्याचा आदर्श मंच प्रकल्पातून ३० काजू प्रक्रिया, ३५ फळ प्रक्रिया ७ विविध उद्योग असे एकूण ८० उद्योजक तयार झाले असून ७०० ते ८०० रोजगार उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी ४ ते ५ हजार शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केली जाते.
सामुदायिक सुविधा केंद्र – ग्रामीण उद्योगांना नवे बळ
कोकम सरबताची १० हजार लिटर क्षमता आंबा रस निर्मितीची ताशी १ हजार बाटल्या फणस, अननस, केळफूल प्रक्रिया ५ हजार किलो ड्रायर, १ टन नवीन ड्रायर ५० टन कोल्ड स्टोरेज ही सर्व साधने ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगांना मागणीअनुरूप गती देत आहेत.
२० कोटी ११ लाखांचा भव्य प्रकल्प
MSME-PCDP अंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी ३ कोटी २१ लाख रुपये सभासदांकडून, उर्वरित रक्कम शासन अनुदानातून प्राप्त झाली आहे. या प्रकल्पातून ५० ते ६० रोजगार निर्माण होणार आहेत.
फळपानांपासून औषधनिर्मिती – नवीन उद्योगसाखळी!
काजू, आंबा आणि जांभळाच्या पानांपासून औषध, सुगंधी द्रव्ये निर्मितीचे संशोधन अंतिम टप्प्यात असून आवश्यक यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर उत्पादनाला सुरुवात होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळेल.
फणसाच्या टाकाऊपासून पशुखाद्य निर्मिती
फणस भाजी तयार करताना उरणारा आतील भाग जनावरांसाठी अतिशय पोषक असल्याने त्यावर आधारित पशुखाद्य पॅलेट निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षीपासून त्याचे उत्पादन सुरू होणार आहे.
प्रकल्पाचा उद्देश – ग्रामीण अर्थसाखळी मजबूत करणे
“शेतकऱ्यांचा माल वाया जाऊ नये, उत्पादनाला बाजारपेठ मिळावी आणि तरुणांना उद्योगसंधी उपलब्ध व्हाव्यात — हेच आमचे ध्येय. संशोधन व प्रक्रियेमुळे ग्रामीण अर्थकारणाची घोडदौड सुरू आहे.”











