सासोलीत एक्सोन - ओरिजिन कंपनीच्या कर्मचाऱ्याला हॉकी स्टिकने मारहाण

६ आज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Edited by:
Published on: April 29, 2024 13:07 PM
views 305  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील एक्सोन च्या ओरिजिन कंपनी आणि स्थानिक यांच्यातील वाद थांबायच नाव घेत नसताना, या कंपनीच्या शाखेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बेधम मारहाण झाल्याची शनिवारी दुपारची घटना रविवारी उगडिकीस आली आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग (४७, रा. डी १५/१००१ सुपरटेक इको व्हिलेज, टू ग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) यांना सहा अज्ञतानी ही मारहाण केली असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत येथील पोलीस ठाण्यात सहा अज्ञात इसमांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.

नसरुद्दीन मोहम्मद रेहान बेग हे सासोली येथील एक्सोन कंपनीच्या ओरिजिन शाखेत सिविल इंजिनियर म्हणून नोकरी करतात. ते शनिवारी दुपारी ३:५० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या सासोली येथील शाखेवर कामाची पाहणी करत होते. दरम्यान तेथील गट क्रमांक १५९ येथे गुरे जाण्याच्या मार्गावर अनोळखी सहा इसम तीन मोटरसायकल घेऊन आले. त्यांच्या हातातील हॉकी स्टिक, बेसबॉल बॅट व दांड्याने बेग यांना काहीही न विचारता मारहाण करण्यास सुरुवात केली. यात फिर्यादीच्या दोन्ही पायांना, डोक्याला व डोळ्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गोव्यातील मणिपूर इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. इस्पितळातून येथील पोलिस ठाण्याला रितसर जखमी बेग यांच्याबाबत कळविण्यात आले. येथील पोलिस ठाण्यात अज्ञात सहा व्यक्तींविरोधात भादवि १४१, १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ३२६, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भगत करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.