शेतकऱ्यांच्या जीवनात घडणार आर्थिक क्रांती

खुद्द 'जिल्हाधिकारी' यांचा पुढाकार
Edited by: शशिकांत मोरे
Published on: April 16, 2025 15:29 PM
views 129  views

रोहा : अधिकारी आपले कर्तव्य बजावत असतो. कर्तव्याबाहेर जात नाहीत असा सर्वांचाच अनुभव आहे. मात्र रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे हे रोह्यातील काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आलेत. शेती, शेतकऱ्यांच्या प्रेमात पडलेल्या जाणिवेच्या प्रगत शेतकरी किशन जावळे यांनी मागील शेती पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना पोर्टेबल सौर पंप देण्याचे आश्वासित केले होते. आश्वासनाच्या केवळ ४० दिवसांच्या कालावधीत जावळे यांनी सीएसआर फंडातून तब्बल ५ कि वॅटचा सौर कृषी पंप दिला. मंगळवारी दुपारी खुद्द जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शेतकऱ्यांना सौर पंप अर्पित केले.

५ एचपी पंप चालवण्याची क्षमता असलेल्या सौर कृषी पंपाने डिझेल पंप, डिझेलवरील लाखो रुपयांचे खर्च वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आता मोठी आर्थिक क्रांती घडणार आहे. आर्थिक क्रांतीचे पुढाकार खुद्द जिल्हाधिकारी किशन जावळे हेच असल्याचे अधोरेखीत झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे खूप वेळ शेती व शेतकऱ्यांत रममाण झाले, शेजारी झुळझुळ वाहणाऱ्या नदी वारा मुख्यतः निसर्गात एकरूप झाले. शेतकरी मुख्यतः महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांसाठी अजून सौर पंप उभे करू, त्यातून पंप, लाखो रुपयांचा डिझेल वाचवून अधिक फायदा शेतकऱ्यांच्या खिशात पडेल असे पुन्हा जिल्हाधिकारी जावळे यांनी आश्वासीत केले तर शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडत घडणार आहे. ती क्रांती घडवणारे किशन जावळे हे जिल्ह्यातील पहिलेच एकमेव जिल्हाधिकारी असतील अशी भावूकता प्रगत शेतकरी विजय वारगुडा यांनी प्रातिनिधिक व्यक्त केली आहे.

किल्ला येथील बारटक्के यांच्या विस्तीर्ण शेतीवर विशेषतः ठाकूर,आदिवासी समाजातील तरुण, ग्रामस्थ, महिला दरवर्षी भाजीचा मळा फुलवतात.अत्यंत प्रगल्भ आणि प्रगतशील शेती म्हणून जिल्ह्यात नावलौकीक मिळाला आहे. दर्जेदार भाजी उत्पादन, मोठी बाजारपेठ अशीच शेती व शेतकऱ्यांची खासियत आहे. मुंबई बाजारपेठेत सकस, दर्जेदार भाजीला प्रचंड मागणी आहे. हाच मळा अनेकांना भुरळ घालतो. त्याच शेती व शेतकऱ्यांच्या प्रेमात खुद्द प्रगत शेतकरी असलेले,शेतीवर प्रेम करणारे जिल्हाधिकारी किशन जावळे पडले. शेतकऱ्यांची मेहनत, अडचणी आणि शेती समजून घेतली. त्याचवेळी डिझेल पंपावर शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होतात, हे जाणवताच जिल्हाधिकारी जावळे यांनी  सौर कृषी पंप देण्याचे आश्वासीत केले होते. त्याची पूर्तत: मंगळवारी झाली. ५ की वॅटचा बिग सौर पंप शेतकऱ्यांना अर्पित केले. यावेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, मॉडेल हेड अभिजीत धर्माधिकारी, मंडळ अधिकारी अमोल सुतार, व्हीआरटीचे सुशील रुळेकर, प्रथमेश जंगे व पत्रकार, नागरिक उपस्थित होते.    

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेवर आधारित १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत सौर कृषी पंप सीएसआरमधून हस्तांतरीत करण्यात आले. आदिवासी बांधवांनी केलेल्या भव्यदिव्य भाजीपाला लागवड क्षेत्र पाहून जिल्हाधिकारी किशोर जावळे यांनी समाधान व्यक्त करत कौतुक केले. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सौर कृषी पंप संकल्पना प्रत्यक्षात साकार केली. ४५ डिझेल इंजिन पंपावर होणारा खर्च सौर कृषी पंप वापरामुळे ५० ते ६० लाख रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे अजून सौर पंपाची उभारणे करू असे जावळे यांनी मनोगतात सांगितले. 

     जिल्ह्यातील हा पहिलाच बिग सौर पंप प्रकल्प रोह्यात उभे राहिले असल्याचे नमूद झाले. प्रास्ताविक बळीराजा फाऊंडेशनचे राजेंद्र जाधव यांनी केले तर मनोगत आभार मकरंद बारटक्के यांनी केले. दरम्यान काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत लवकरच वनभोजन करण्याची विनंती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मान्य केल्याने शेतकरी जाणिवेचे अधिकारी अशीच नवीन ओळख आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांची झाली आहे.