चप्पल दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न फसला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 28, 2024 14:41 PM
views 261  views

देवगड :  देवगड तालुक्यातील एस्टी डेपो आवारात असलेल्या एका चप्पल दुकानात चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला असून यामुळे देवगड बाजार पेठेत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. हा एसटी डेपोच्या आतील स्टॉल आहे. यामुळे एसटीच्या सिक्युरिटीच्या सिस्टीम वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यापूर्वी बाजूच्या पर्यटन मार्गदर्शन केंद्राचा गाळ्याच्या खिडकीच्या काचा देखील अज्ञातंकडून फोडण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे एसटीचे सुरक्षारक्षक नेमके काय करतात हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देवगड एस्टी स्थानक परिसरात प्रमिला प्रभाकर दहिबांवकर यांच्या मालकीचे श्री समर्थकृपा हे चप्पल दुकान असून रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता दुकान बंद करून त्या दहिबांव येथे घरी गेल्या.सोमवारी सकाळी ६.४५ वा.नेहमीप्रमाणे त्यांनी येवून दुकान उघडले यावेळी दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा त्यांना कोपèयातून उघडलेला दिसला.तर त्या पत्र्याचा उघडलेल्या बाजुकडे दुकानात आत ठेवलेले चप्पल चोरट्यांनी काढून बाहेर फेकल्याचे निदर्शनास आले.त्यांनी या घटनेबाबत देवगड पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पो.हे.कॉ.उदय शिरगांवकर यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली व माहिती केली.

तसेच याबाबत देवगड पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगीतले.दरम्यान दहिबांवकर यांच्या दुकानात रक्कम ठेवलेली नव्हती मात्र दुकानाचा मागील पत्रा पुर्णत: काढण्यात चोरट्याला यश न आल्याने त्यांनी पत्रा काढण्याचा प्रयत्न करून आतील मिळेल त्या चप्पल बाहेर काढून त्या तेथेच टाकून पळ काढला.पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असलेल्या परिसरातच लागोपाठ चोरीची ही दुसरी घटना आहे.