बँकां - शासकीय कार्यालयात मराठीतून संवाद साधण्याचं आवाहन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 26, 2024 11:37 AM
views 41  views

सावंतवाडी : बोली भाषा मराठी असताना सर्रास अनेक ठिकाणी इंग्रजी व हिंदीचा वापर शासकीय कार्यालय, बँकांमध्ये संवाद साधताना ऐकायला येतो. त्यामुळे मराठी भाषा टिकावी आणि तिचे जतन व्हावे यासाठी उद्या 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व बँकांमध्ये व शासकीय कार्यालय, हॉस्पिटल येथे जाऊन मराठी भाषेविषयी जनजागृती करावी व तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेतच संवाद साधावा असे आवाहन केले जाणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी, कर्मचारी हे नागरिकांशी संवाद साधताना हिंदी,इंग्रजी भाषेचा वापर करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या बोली भाषा मराठीतच सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संवाद साधावा या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे. उद्या 27 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बँक व बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक तसेच शासकीय रुग्णालय या ठिकाणी भेट देऊन त्यांना मराठी भाषेविषयी पत्रके वाटली जाणार आहेत. तरी या उपक्रमात सर्व मराठी भाषा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अँड. संतोष सावंत व सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.